PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

फिशिंग हल्ले कसे ओळखावे आणि थांबवावे

bopanna|3 min read|20 March, 2025

URL copied to clipboard

फिशिंग हल्ले दिवसेंदिवस वाढत असून, भारतातील नागरिकांना ईमेल, मजकूर संदेश आणि फोन कॉलद्वारे लक्ष्य केले जात आहे. डिजिटल सेवांचा वापर करण्यासाठी मुख्यतः मोबाईल डिव्हाइसचा उपयोग माध्यम म्हणून होत असताना, भारत अशा फसवणुकीच्या योजनांसाठी एक मोठे लक्ष्य ठरला आहे. त्यामुळे तुमची ओळख आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी, हे घोटाळे कशा प्रकारे केले जातात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

फिशिंग आणि त्याचे प्रकार समजून घेऊ या :

फिशिंग म्हणजे काय?

फिशिंग हा एक सोशल इंजिनीअरिंग प्रकारचा घोटाळा आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती लोकांची दिशाभूल करून त्यांची संवेदनशील वैयक्तिक माहिती मिळवतात किंवा मालवेअर डाउनलोड करणाऱ्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडतात.

फिशिंग करणारे बनावट ईमेल पाठवून फसवणूक करतात. हे ईमेल बँक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा सरकारी संस्था असल्याचा आभास निर्माण करतात. असे संदेश पाहिल्यावर घाईने कृती करण्यास प्रवृत्त केले जाते. लिंक क्लिक करणे, अटॅचमेंट डाउनलोड करणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे यासाठी दबाव टाकला जातो. पासवर्ड, डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा आधार तपशील मागितले जातात.

फिशिंग ईमेल कसे ओळखावे

  • सामान्य मजकूर: अधिकृत ईमेलमध्ये तुमचे नाव दिलेले असते आणि बँकिंगसंदर्भातील ईमेल असल्यास कार्ड क्रमांक किंवा खाते क्रमांक, तर ई-कॉमर्स ब्रँडकडून असल्यास ऑर्डर क्रमांक नमूद केलेला असतो. फिशिंग ईमेलमध्ये अशी कोणतीही माहिती नसते आणि फक्त लिंक क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते.  
  • संशयास्पद पाठवणारा: ईमेल ॲड्रेस नीट तपासा. त्यात स्पेलिंगच्या चुका किंवा सामान्यपणे ईमेल ॲड्रेसमध्ये न वापरण्यात येणारी चिन्हे असू शकतात.  
  • त्वरित कृतीसाठी आग्रह: “तातडीने कारवाई आवश्यक” किंवा “तुमचे खाते बंद केले जाईल” अशा वाक्यांचा समावेश असतो, जी संशयास्पद असतात.  
  • वैयक्तिक माहितीची मागणी: अधिकृत संस्था ईमेलद्वारे संवेदनशील माहिती क्वचितच मागतात.  
  • व्याकरण आणि स्पेलिंगच्या चुका: फिशिंग ईमेलमध्ये अनेकदा टायपिंगच्या किंवा व्याकरणाच्या त्रुटी दिसतात.

फिशिंग कसे टाळावे

  • अनपेक्षित ईमेलवर विश्वास ठेवू नका : ओळखीच्या संस्थेकडून ईमेल आला असला तरीही काळजी घ्या. संदेश नीट वाचा आणि पाठवणाऱ्या व्यक्तीची पडताळणी न करता घाईगडबडीत लिंक क्लिक करू नका.  
  • संशयास्पद ईमेलमधील लिंक क्लिक करू नका : त्या ऐवजी, त्या संस्थेचा अधिकृत वेबसाइट ॲड्रेस ब्राउझरमध्ये स्वतः टाइप करा.  
  • पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पडताळून घ्या : ईमेल खरा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, दिलेल्या लिंकवर न जाता अधिकृत फोन नंबर किंवा वेबसाइटद्वारे संस्थेशी थेट संपर्क साधा.  
  • सॉफ्टवेअर अपडेट ठेवा : अँटिव्हायरस आणि वेब ब्राउझर अपडेट असल्यास फिशिंग हल्ले शोधणे आणि टाळणे सोपे होते.

स्मिशिंग म्हणजे काय?

स्मिशिंग (SMS फिशिंग) हा फसवणुकीचा प्रकार आहे, जिथे फसवणूक करणारे लोक मजकूर संदेशांचा वापर करून पीडितांना घातक लिंक क्लिक करण्यास किंवा वैयक्तिक माहिती देण्यास प्रवृत्त करतात. ते कधी कुरिअर सेवा तर कधी बँक असल्याचे भासवतात किंवा तुम्ही बक्षीस जिंकल्याचा दावा करतात.

स्मिशिंग फसवणूक कशी ओळखावी

  • खोटी पॅकेज डिलिव्हरी सूचना: “तुमचे पॅकेज लवकरच येत आहे. पत्ता निश्चित करण्यासाठी येथे क्लिक करा.”  
  • OTP आणि वैयक्तिक माहितीची मागणी: फसवणूक करणारे खाते पडताळणीच्या बहाण्याने OTP किंवा वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.  
  • स्पर्धा किंवा बक्षीस जिंकल्याचा खोटा दावा : “अभिनंदन! तुम्ही मोफत गिफ्ट जिंकले आहे. त्वरित क्लेम करा!”

स्मिशिंग कसे टाळावे

  • संशयास्पद संदेशांमधील लिंक क्लिक करू नका : SMSबद्दल सजग राहा, ओळखीचा क्रमांक दिसला तरीही सतर्क राहा.  
  • कधीही उत्तरादाखल वैयक्तिक माहिती पाठवू नका : अधिकृत संस्थांकडून संदेशाद्वारे संवेदनशील माहिती विचारली जात नाही.  
  • संशयास्पद नंबर ब्लॉक करा : यामुळे स्मिशिंग फसवणुकीचे प्रमाण कमी होऊ शकते.

विशिंग म्हणजे काय?

विशिंग (व्हॉइस फिशिंग) हा फसवणुकीचा प्रकार आहे, जिथे गुन्हेगार फोन कॉलद्वारे लोकांना गोपनीय माहिती उघड करण्यासाठी फसवतात. फसवणूक करणारे कधी तांत्रिक सहाय्य प्रतिनिधी, कधी सरकारी एजन्सी किंवा अडचणीत सापडलेले कुटुंबीय असल्याचे भासवतात. सोशल इंजिनीअरिंगचे तंत्र वापरून ते लोकांना वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक तपशील देण्यास भाग पाडतात.

विशिंग फसवणूक कशी ओळखावी

  • बनावट कॉलर आयडी : फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कॉल अधिकृत संस्थांकडून केल्याचे भासवतात.  
  • भावनिक फसवणूक : आणिबाणीची परिस्थिती असल्याचे भासवून घाबरवण्याचा प्रयत्न करतात, जसे की बँक खाते सुरक्षित नसल्याचा दावा किंवा कर भरला नसल्याचे सांगणे.  
  • सोशल इंजिनीअरिंग : ओळख पडताळणीच्या नावाखाली पासवर्ड, पिन किंवा OTP यांसारखी संवेदनशील माहिती विचारतात.

विशिंग फसवणूक कशी टाळावी

  • कॉल करणारी व्यक्ती बँकेतून कॉल असल्याचा दावा करत असला तरी बँकेशी संबंधित माहिती किंवा OTP फोनवर कधीही शेअर करू नका,.  
  • अनोळखी कॉलमध्ये आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती विचारली गेल्यास सावध व्हा.  
  • शंका वाटल्यास कॉल त्वरित बंद करा आणि संबंधित संस्थेच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधा.

सामान्यपणे आढळणारी कार्यपद्धती : दिशाभूल करणे

फिशिंग, स्मिशिंग आणि विशिंग या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी दिशाभूल करण्यावरच सगळ्या पद्धती अवलंबून असतात. या प्रकारांमध्ये विश्वास, भीती किंवा कुतूहलाचा गैरफायदा घेतला जातो आणि आपल्या हिताला हानी पोहोचविणारी कृती करण्यास भाग पाडण्यात येते. या फसवणुकींची कार्यपद्धती समजून घेतली आणि सुरक्षित ऑनलाइन सवयी आत्मसात केल्या तर अशा प्रकारांना बळी पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. जागरूक राहा, सतर्क राहा आणि फिशिंग घोटाळ्यांना बळी पडू नका!

फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंगच्या प्रसंगांची तक्रार कशी करावी

तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा तुम्हाला संशय आला तर त्याची लगेचच तक्रार करा :

PhonePe वर तक्रार करणे

  • PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि तक्रार नोंदवा.  
  • PhonePe ग्राहक सेवा: 80-68727374 / 022-68727374 या क्रमांकावर कॉल करा.
  • वेबफॉर्म सबमिशन:  PhonePe सपोर्टला भेट द्या
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग :
  • तक्रार निवारण : PhonePe Grievance Portal वर तक्रार नोंदवा.

अधिकृत संस्थांमध्ये तक्रार नोंदवणे

  • सायबर क्राइम सेल: ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी सायबर क्राइम पोर्टलला भेट द्या किंवा 1930 वर कॉल करा. 
  • दूरसंचार विभाग (DOT): संशयास्पद संदेश, कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप फसवणुकीची माहिती संचार साथी पोर्टलवरील चक्षु सुविधेद्वारे नोंदवा.

महत्त्वाची सूचना— PhonePe तुम्हाला कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. ज्या ई-मेल phonepe.com डोमेन वरून आलेल्या नाहीत अशा सर्व PhonePe पासून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading