Investments
तुमच्या मासिक उत्पन्नातून तुम्ही पुरेशी बचत करताय का?
PhonePe Regional|2 min read|11 June, 2021
माझ्या मासिक उत्पन्नामधून मी साधारण किती टक्के गुंतवणूक केली पाहिजे? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल ना. अनेकांच्या मनात हा विचार येतोच. गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या प्रवासात हा प्रश्न पडणं साहजिक आहे.
मात्र या प्रश्नाचं ठोस असं एकच उत्तर नाही. ते प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं असू शकतं. परंतु, तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, तुम्ही किती रक्कम गुंतवली पाहिजे यासंबंधी आम्ही तुम्हाला टिप्स नक्कीच देऊ शकतो.
थोडं पटकन समजावं म्हणून क्रिकेटचं उदाहरण घेऊ या!
समजा 50 ओव्हरची एकदिवसीय क्रिकेट मॅच आहे. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग घेतलेल्या टीमला, मॅच जिंकण्यासाठी नक्की किती रन करायचे आहे आणि रनरेट किती असायला हवा हे अचूकपणे ठरवता येत नाही.
पण तरीही, डाव खेळताना टीम मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अशा किमान रनरेटचा (प्रति ओव्हर 5–6 रन) अंदाज घेते (एकूण जितका जास्त रन रेट तितकी जिंकण्याची शक्यताही जास्त असते.).
आपलंही तसंच आहे, तुम्ही विशीत किंवा तिशीत असता, तेव्हा तुम्हाला कदाचित भविष्यात नक्की किती गुंतवणूक करावी लागेल याचा नेमका अंदाज येणं कठीण असू शकतं. तुमच्या आर्थिक गुंतवणुकीचं ध्येय हे तुमच्या लाइफस्टाइल, उत्पन्न, कौटुंबिक महत्त्वाकांक्षा यासारख्या घटकांनुरूप बदलत असतं.
तुमचं आर्थिक गुंतवणूक ध्येय नक्की नसलं, तरीही तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. एक निश्चित असा गुंतवणुकीचा क्रम निवडू शकता — साधारणपणे तुमच्या एकूण उत्पन्नापैकी 30 ते 40 टक्के रकमेची गुंतवणूक ही उत्तम गुंतवणूक मानली जाते.
एखादा फलंदाज एका ओव्हरमध्ये पाचपेक्षा जास्त रन कदाचित काढू शकणार नाही, त्याप्रमाणेच तुम्हीही प्रत्येक वेळेस 30 ते 40 टक्के बचत करू शकालच असे नाही आणि त्यासाठीही हरकत नाही. ठरावीक काळानंतर ठरावीक गुंतवणूक होणं हे मूळ उद्दिष्ट्य आहे. त्याप्रमाणेच तुमच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही जास्त रकमेची (50% असं म्हणू या) गुंतवणुूक करू शकत आहात, तर ती नक्की करा. कारण भविष्यात कदाचित तुम्हाला 30–40 टक्क्यांची गुंतवणूक करता येईलच असे नाही.
लक्षात ठेवा, जितक्या कमी वयात गुंतवणुकीला सुुरुवात कराल आणि दीर्घकाळ गुंतवणूक कराल तितकी तुमच्या संपत्तीत वाढ होईल. चक्रवाढ पद्धतीने हे शक्य होतं. (याबद्दल या ब्लॉग मध्ये अधिक वाचा)
जरा क्रिकेटचं उदाहरण परत एकदा पाहू. थोडा बदल करू त्यात. आता बघा, आपली टीम एकदिवसीय क्रिकेट मॅचमध्ये दुसऱ्या डावात बॅटिंग करणार आहे. आता फलंदाजाला नक्की किती रन काढायचे आहेत याची अचूक कल्पना असते आणि त्याप्रमाणे रनरेट ठरवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करता येतात.
त्याप्रमाणेच तुमच्या तिशी आणि चाळिशीमध्ये, तुम्हाला तातडीने गरज भासेल, कमी काळानंतर गरजेची असेल किंवा दीर्घ काळानंतर गरज लागेल अशी आर्थिक गुंतवणुकीची ध्येय ठरवता येतात. आर्थिक गुंतवणुकीतील या स्पष्टतेमुळे तुम्हाला तुमची आर्थिक ध्येयं प्राप्त करण्यासाठी नेमकी किती रक्कम गुंतवावी लागेल त्यासाठी नेमके प्रयत्न करता येतात. यात जोखीम आणि परताव्यांची नेमकी तारीख याही गोष्टी लक्षात घेता येतात. उदाहरणार्थ, आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी विशिष्ट रक्कम जमा करणे, मुलाच्या भविष्यासाठी नियोजन करणे, कार खरेदी करणे यासारखी ध्येयं असू शकतात. (आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक यावर वेगळ्या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करू.) या प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्हाला काही नियमित गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते आणि अशा सर्व प्रकारच्या गुंतवणुका तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात.
अर्थात, सर्वात आधी तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या उत्पन्नातील 20 टक्के असो, 30 टक्के असो की 40 टक्के आधी सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणुकीला एकदा सुरुवात केलीत की तुमच्या प्रगतीनुसार तुमच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासानुसार तुमची रक्कम वाढू शकते.
म्युच्युअल फंड बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन असतात. कृपया गुंतवणूकीपूर्वी सर्व योजनांशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.